Friday, July 24, 2009

शहापूरची संक्षिप्त ओळख

ठाणे जिल्हयातील भिवंडी उपविभागात सामाविष्ट करण्यात आलेला शहापूर तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. एकूण क्षेत्रफळ १,५४,२७० हेक्टर म्हणजे १९३९ चौ.कि.मी. आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगीतील डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुक्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा आहे. दक्षिणेस मुरबाड, कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, काथोडी, महादेव कोळी, या, आदिवासी जमाती शहापूर तालूक्यातील आदिवासी जमातीपैकी आहेत. एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र ३ शहापूर तालुक्यातून  जात असून संपूर्ण तालुक्यातील त्याची लांबी, ६५ कि. मी. आहे. मुंबई-आग्रा महामार्ग होण्यापूर्वी मुरबाड मार्गे माळशेज-नाणे घाटातून अन्य भागांशी पूर्वीपासून संपर्क होता. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, १८४० मध्ये मुंबई-भिवंडी-नाशिक रस्ता सुरु झाला. कल्याण कसारा रेल्वे मार्गाचे काम १८५४ नंतर सुरु झाले.

१ ऑक्टोंबर १८५५ पर्यंत कल्याण वासिंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले. मुंबई ते वासिंद या पहिल्या रेल्वेची जाहिरात The Bombay Times मध्ये दिवाळीत देण्यात येवून वासिंद कडे गाडी सोडण्यात येणार असल्याची बातमी देण्यात आली. ७ नोव्हेंबर १८५५ रोजी दुपारी १ वाजता बोरीबंदरहून (सीएसटी ) गाडी सुटणार आणि ३.३० वाजता वासिंडला पोहचून ती पुन्हा संध्याकाळी ६.१५ वाजता मुंबईला जाण्यास निघणार होती. मे १८५४ ते नोव्हेंबर १८५५ या कालावधीत कल्याण-वासिंद रेल्वे मार्ग पूर्ण होवून आदिवासी-जंगलपट्टीचा प्रदेश असणारया शहापूर तालुक्यात रेल्वे आली त्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. शहापूर तालुक्यातील विहीगाव-ईहेगावचा पूल हा त्यावेळचा चमत्कार मानला जात होता. 


शहापूर तालुक्यातील वासिंद हे सर्वात जुने स्थानक आहे. १९२९-३० च्या सुमारास विजेवर चालणाऱ्या गाड्या सुरु झाल्या थळघाट सुरु होण्यापूर्वी तसेच उपनगरीय रेल्वे मार्गाचे शेवटचे स्थानक असलेला कसारा, शहापूर तालुक्यात असून वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारा हि रेल्वे स्थानके शहापूर तालुक्यात येतात. ब्रिटीश कालीन ग्रेट इंडियन पेनेन्सुला रेल्वे (GIP) म्हणजे सध्याच्या मध्य रेल्वेवर असणाऱ्या आसनगाव स्थानकाचे सध्याचे आसनगाव  हे नाव अलीकडील असून त्याचे पूर्वीचे नाव शहापूर होते. आसनगाव स्थानकापासून शहापूर गाव २ कि.मी. अंतरावर आहे. ब्रिटीश काळात बांधलेले रेल्वे गुदाम, बुकिंग ऑफीस आजही कायम आहेत. रेल्वे व रस्ता वाहतुकींच्या सोयीमुळे शहापूरच्या विकासाला चालना मिळाली आहे. 


शहापूर नावाच्या उत्पातीविषयी निष्कर्ष लावणे अशक्य आहे. काही जेष्ठ नागरिकांच्या मते शहापूरचे मूळ नाव सिंहपूर आहे. सिंहपूरचा अपभ्रंश शहापूर झाले असल्याचे म्हंटले आहे. मुळात शहापूर हे गाव नंतर वसले असावे. कारण कल्याण नाशिक रस्ता माहुली किन्हई खिंड तानसा असा होता. ब्रीटिशकालात तानसा धरणाचे काम सुरु झाल्यानंतर हा रस्ता बंद झाला. तसेच जंगली श्वापद व चोऱ्या ह्यामुळे तेथील वस्ती उठून शहापूर गाव वसत गेले. बहुतांशी वस्ती माहुली परिसरात असल्याची माहिती मिळते. शिवकालीन व पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने माहुलीचा उल्लेख येतो. शिवकाव्यात माहुलीचा उल्लेख मलयाचल असा करण्यात आला आहे. पेशवाईच्या अस्तानंतर माहुली येथील वस्ती उठत गेली आणि शहापूर गाव वसत गेले. नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही. माहुली  किल्ला व पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढे मध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे आणि सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे. 


शहापूर नावाचे दुसरे एक वैशिठ्य म्हणजे आज शहापूर म्हणून ओळखला जाणारा तालुका पूर्वी म्हणजे सुमारे दीड शतकापूर्वी  "कोळवण" तालुका म्हणून ओळखला जायचा. १८६०-६३ मधील "मिलिटरी डीपार्टमेंट  डायरी" क्र. ९५७ मधील पृष्ठ ३२५ वर माहुली किल्ल्याचे वर्णन असून हा किल्ला कोळवण तालुक्यात असल्याचा उल्लेख आहे. यावरून शहापूर तालुका पूर्वी कोळवण तालुका म्हणून ओळखला जायचा. ई.स . १८८० च्या सुमारास ब्रीटिशानी कोळवण चे रुपांतर शहापूरमध्ये केले व मोरवाडा पेठा प्रशासनाच्या सोयीसाठी शहापूर पासून वेगळा केला. सिंहपूर, माहुली कोळवण, अशी नावे शहापूरला होती असे लक्षात येते. 


शहपुरचे हवामान साधारणपणे उष्ण व दमट आहे. भरपूर पाउस व सदाहरित जंगले यासाठी तालुक्याला प्रसिद्धी मिळाली. ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्य याच तालुक्यात आहे. १९४१ मध्ये शहापूर येथे वनप्रशीक्षण विद्यालय स्थापन करण्यात आले. भरपूर पावसामुळे अर्थातच शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्पादन  जास्त असून "भाताचे कोठार"  म्हणून शहापूर तालुका ओळखला जाई. ब्रिटीश काळात एक उत्तम बाजारपेठ म्हणून शहापूर प्रसिद्ध होते. औद्योगिक विकास मात्र होवू  नाही. नो केमिकल झोन मुळे  औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत. 


तानसा, वैतरणा, भातसा नद्या हा या तालुक्यातील मुख्य जलस्रोत आहे. तानसानदी तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावते. भातसानदिचा उगमही घाटमाथ्यावर असून हि नदी  येथे उल्हास नदीस मिळते. वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला असून शहापूर तालुक्यात वाहते व नवघर येथे अरबी समुद्रास  मिळते. भारंगी नदीचा उगम माहुली पर्वतावर असून पुढे ती भातसा नदीस मिळते. नद्यांची उपलब्धता आणि पर्जन्यमान यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटीशकाळात धरणे बांधण्याची कल्पना पुढे आली. आणि स्वातंत्रपूर्व काळात प्रथम तानसा आणि वैतरणा (मोडकसागर ) हि धरणे बांधण्यात आली. तर भातसा धारण १९६५ मध्ये बांधण्यात आले. तानसा, वैतरणा, भातसा हि मोठी धरणे तर जांभे, मुसई, डोळखांब, आदिवली, वेहळोली व खराडे, हे लघुपाटबंधारे प्रकल्प शहापूरमध्ये आहेत. याशिवाय जपानच्या मदतीने उभा असलेला चोंढे जलविद्युतप्रकल्प तालुक्यातील डोळखांब येथे आहे.

1 comment:

  1. Hi Vaibhav very good website created that is www.airolikoliwadagovindapathak.com

    My best wishes to you. good job. carry on

    Best regards,
    Mukesh Patil


    www.gorai.com
    www.murdha.com
    www.khandoba.com
    www.agrisamaj.co.in mailto:mukesh@gorai.com

    ReplyDelete